#पुस्तकांच्या कविता
१.
एकावर एक
रचलेल्या पुस्तकांच्या ढिगातील
सगळ्यात वरच्या पुस्तकाला
वाटते....
मी माझ्यातल्या गुणांनी
वरच्या थराला पोहचलो.
तर, खालच्या
पुस्तकाला वाटते...
सगळ्यांना उचलून धरण्याची
क्षमता माझ्यातच आहे.
या चढाओढीत
मधल्या पुस्तकांची
होणारी घुसमट
अगदी...
तुमच्या आमच्या
सारखीच असते.
२.
पुस्तक नवं कोरें
असतांना विकले जाते
वातानुकूलित बुकशॉप मधून,
थोडे जुने झाल्यावर
फुटपाथ वरील पुस्तक
विक्रत्याकडे
सगळ्यात वाईट अवस्था असते
किलोच्या भावाने विकणाऱ्या
रद्दीवाल्याकडे...
माणसाची जिंदगी पण
पुस्तकांपेक्षा
काही वेगळी नसते.
*संजय पाटील
अ-२०३, विराजधाम, नाना शंकर सेठ रोड, सेंट्रल बँकेच्या मागे. डोम्बिवली (प) ४२१२०२
मो. ९१६७९६१६६६

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा